मुंबई : भटक्या श्वानांना रोखण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेने शिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. हा आदेश शिक्षण व्यवस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारा असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे. शिक्षकांनी शिकवायचे, निवडणुकीची कामे करायची की श्वानांना पळवायचे असा सवाल शिक्षकांनी केला आहे.
शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस थांबे अशा सार्वजनिक ठिकाणी भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर महिन्यात दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्यासाठी शिक्षण विभागाने ही जबाबदारी शिक्षकांंवर टाकली आहे. शाळांमध्ये भटक्या श्वानांचा वावर रोखण्यासाठी शिक्षकांना “नोडल अधिकारी” म्हणून नेमण्याचा आदेश शिक्षण निरीक्षकांनी काढले आहेत. चेंबूर येथील शिक्षण निरिक्षकांनी काढलेल्या एका आदेशामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत काढलेला हा आदेश शिक्षण व्यवस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केला आहे.







