ठाणे : ठाणे आणि कल्याण, डोंबिवली महापालिकेतील शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कोर्टनाका येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. माघार घेणाऱ्या उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेण्यात आल्याचा गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच दिवसभरात १०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गट आणि भाजपचे काही उमेदवार बिनविरोध आल्याने अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. आमच्या अनेक उमेदवारांना संपर्क केले जात होते. कोपरी येथील मनसेच्या उमेदवाराला पाच कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मशाल चिन्हावरील एका उमेदवार महिलेच्या घरी शुक्रवारी सकाळी पोलीस गेले. तसेच त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली. त्यांना रात्रीपासून अनेकजण शोधत होते. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला.
कल्याण, डोंबिवलीतील अनेक उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेण्यात आले असा आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच आता पाच कोटी वाटले, निवडणूकीमध्ये तर आम्हाला प्रचारासाठी फिरू देखील दिले जाणार नाही असे जाधव म्हणाले. ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्या मोबाईल काॅलचा तपशील तपासावा. त्यांना कोणी संपर्क साधले, त्यांनी का उमेदवारी मागे घेतली, तेथील निवडणूक अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी निवडणूक आयोगाकडे केली. आम्ही आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिली. पूर्वी मतदार विकत घेतले जात होते, पण आता उमेदवार विकत घ्यायला लागले आहेत. पुढील पाच वर्षांनी या देशात निवडणूका होणार नाहीत. निवडणुकीचे खोटे अमीष दाखवून कशाला निवडणूका घेता अशी टीका देखील त्यांनी केली. अर्ज मागे घेण्यासाठी दिवसभरात १०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा देखील जाधव यांनी केला.







