मुंबई : निर्यात क्षेत्रात गुजरातने तर नीती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक’ राज्यांच्या यादीत तमिळनाडूने आघाडी घेतल्याने निर्यातीत महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचे चित्र समोर आले आहे. उद्योग, विदेशी गुंतवणूक या सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असायचे. अगदी निर्यातीतही महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक होता. पण हे चित्र आता बदलू लागले आहे. नीती आयोगाने ‘निर्यात सज्जता निर्देशांक’ अहवाल तयार केला असून तो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यात निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या राज्यांच्या यादीत तमिळनाडू हे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
२०२१-२२ या आर्थिक वर्षांत देशातून सर्वाधिक निर्यात ही गुजरात राज्यातून झाली होती. यातही महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार, २०२१-२२ या वर्षांत देशातून झालेल्या एकूण निर्यातीपैकी ३० टक्के वाटा हा गुजरातचा होता. दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्राचा वाटा १७.३३ टक्के होता. २०१९-२० या आर्थिक वर्षांत महाराष्ट्र हे निर्यातीत पहिल्या क्रमांकाचे राज्य होते. तेव्हा राज्याचा वाटा २०.७१ टक्के तर गुजरातचा वाटा २०.२५ टक्के होता. २०२०-२१ या वर्षांत गुजरातमधून २०.७६ टक्के तर महाराष्ट्रातून २०.०१ टक्के निर्यात झाली होती. गेल्या वर्षी गुजरातने २० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर झेप घेतली तर महाराष्ट्राची पिछेहाट झाली. गुजरातमधून इंधन व पेट्रोलियम पदार्थाची मोठय़ा प्रमाणावर निर्यात होते. यामुळेच गुजरातचा वाटा वाढल्याचे निरीक्षण नीती आयोगाने नोंदविले आहे. गुजरामधील निर्यात ६३ अब्ज डॉलर्सवरून वर्षभरात १२७ अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे.
महाराष्ट्रातून मुख्यत्वे औषधे, हिरे, लोखंड आणि पोलादाची निर्यात होते. निर्यातीत देशातील पाच आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन तर गुजरातमधील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. तेलशु्द्धीकरण प्रकल्प असलेल्या गुजरामधील जामनगर जिल्ह्यातून सर्वाधिक १२.१८ टक्के निर्यात झाली आहे. सूरत (४.७५ टक्के), मुंबई उपनगर (३.७५ टक्के), मुंबई शहर (३.७० टक्के), पुणे (२.७३ टक्के) निर्यात गत वर्षांत झाली आहे. भविष्यातील निर्यातीसाठी नीती आयोगाने निर्यात सज्जता निर्देशांक राज्यांची यादी तयार केली आहे. यात तमिळनाडू राज्याने आघाडी घेतली आहे. नीती आयोगाने आधी निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे राज्यांची वर्गवारी केली आहे. तमिळनाडू राज्याला १०० पैकी ८०.८९ टक्के गुण मिळाले. महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. कर्नाटक, गुजरात, हरयाणा या राज्यांचा नंतर क्रमांक लागतो.