पुणे : पुणे शहरातील हिट अँड रन केसमध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला अटक केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरातील ४९ पब आणि बारवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच सुरेंद्रकुमार अग्रवालच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघातानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. उद्योगपती विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर आणि मुलाच्या वडिलांवर कारवाई केल्यानंतर ड्रायव्हरला धमकावल्याच्या आरोपाखाली आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यालाही अटक करण्यात आली आहे.
अटकेनंतर पुणे पोलिसांनी सुरेंद्रकुमार याच्या घरावरही छापेमारी केली. अग्रवाल कुटुंबियांच्या घराची झाडाझडती पोलिसांकडून घेण्यात आली. अल्पवयीन आरोपीसोबत असलेल्या ड्रायव्हरला धमकावल्याचे, त्याला डांबून ठेवल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी घरावरही छापेमारी केली आहे. दरम्यान, या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे शहरातील पब, कारविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली असून शहरातील तब्बल ४९ पब आणि बारवर धडक कारवाई केली आहे. तसेच शहरातील सर्व पब तसेच बारचे लायसन्स तपासले जाणार असून त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.