मुंबई : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात गुरुवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र सन २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे.
आज, दिनांक २५ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. एवढेच नव्हे तर, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे, यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, ही देखील सकारात्मक बाब आहे. असे असले तरी, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सदर पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही ५ टक्के आणि १० टक्के कपात अनुक्रमे नियत दिनांकापासून लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.
पाण्याचा अपव्यय टाळावा-
दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.
आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.
घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.
वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.
नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्यां किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱ्यां तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.
उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.
सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.