पुणे : पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी एका स्कूलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याच दरम्यान सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी” असं सुप्रिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत २१ वर्षीय तरुणी गेली होती. यावेळी या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते. मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता, त्यानंतर आता पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी ही मुळची सूरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथे राहणारा आहे. दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. गुरुवारी रात्री सदर दोघे दुचाकीवर बोपदेव घाट या ठिकाणी फिरायला गेले. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.