नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ होत जातंय. वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले असून खराब हवेमुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सुधारणांद्वारे तयार केलेला पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे दंतहीन असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) ऐश्वर्या भाटी यांनी केंद्राचे प्रतिनिधित्व करत न्यायालयाला आश्वासन दिले की १० दिवसांत नियम अंतिम केले जातील आणि कायदा कार्यान्वित केला जाईल.
न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओका यांच्या खंडपीठाने पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न केल्याबद्दल पंजाब सरकारला फटकारले. “पंजाबमधील ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्यांच्यावर खटला चालवा. तीन वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही”, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कलम २१ नुसार जगण्याचा अधिकार, शुद्ध हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. अशा स्थितीत सरकारांचे अपयश म्हणजे नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन आहे. राज्यांनी दिलेल्या प्रस्तावावर दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा आणि भरपाईची रक्कम वाढवण्याबाबतच्या नियमात बदल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही स्पष्ट करतो की जर परिस्थिती सुधारली नाही आणि असेच चालू राहिले तर आम्ही कठोर आदेश जारी करू. राज्ये आणि आयोग यांच्यातील समन्वयही महत्त्वाचा आहे, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय राजधानीत प्रचंड धुकं जमा झालं होतं. तिथे हवेची गुणवत्ता ३६३ AQI सह ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहिली. तर आणखी काही भाग “गंभीर” झोनमध्ये आले. जवळजवळ सर्व हवामान निरीक्षण केंद्रे रेड झोनमध्ये होती. जहांगीरपुरी मॉनिटरिंग स्टेशनने ४१८ वर “गंभीर” वायु गुणवत्ता निर्देशांक नोंदवला, तर विवेक विहारचे वाचन ४०७ आणि आनंद विहारचे ४०२ होते. सोनिया विहार येथे AQI “गंभीर” श्रेणीच्या जवळ ३९८ होता, तर वजीरपूरमध्ये ३९६ नोंदवला गेला. एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग प्रोटेक्शन यंत्रणेच्या अहवालातून पुढील दोन दिवसांत दिल्लीतील हवेचे प्रदूषण पाच पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी कार्बन मोनोऑक्साईडची पातळी सात पटीपर्यंत जाऊ शकते. अशी परिस्थिती उद्भवल्यास श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतील. तसंच, अनेक रुग्णशय्येवर असलेल्या रुग्णांसाठीही ही धोक्याची घंटा आहे. याच कारणामुळे पंजाब, हरियाणामध्येही वायू प्रदूषण वाढले आहे.