मुंबई : पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने मोठी प्रगती केली असून ४९६ पूरप्रवण ठिकाणांपैकी ४०३ ठिकाणांवरील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यात आली आहे. उर्वरित ९३ ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होत असला तरी त्यापैकी १३ ठिकाणांवरील समस्या सोडवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित ठिकाणी एकूण ५४७ पंप बसवण्यात येणार असून हे सर्व पंप १ मेपासून कार्यान्वित होतील. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यंदा पावसावर ‘एल निनो’चा प्रभाव असू शकतो, मात्र मान्सून कधीही येऊ शकतो, त्यामुळे पूर्ण तयारी ठेवण्यात येत आहे. पाणी साचण्यामागील कारणांचा शोध घेऊन निचऱ्याचे मार्ग स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.
पावसाळ्यात तातडीने प्रतिसाद देण्यासाठी १५ मेपासून २४x७ मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. प्रत्येक पंप चालकाला स्मार्टफोन देऊन त्याचे त्या ठिकाणाशी जिओ-फेन्सिंग करण्यात येणार असून, संबंधित ठिकाणांची छायाचित्रे नियंत्रण कक्षात पाठवली जातील. तसेच १० फिरते डीवॉटरिंग पंप असलेली वाहने तैनात केली जाणार असून प्रत्येक परिमंडळ कार्यालयात एक वाहन उपलब्ध असेल. याशिवाय शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील अभियंत्यांच्या कार्यालयातही स्वतंत्र पंप वाहने ठेवली जातील. मरोळ नाका, शीतलादेवी, वरळी नाका, महालक्ष्मी तसेच माटुंगा, भांडूप, चुनाभट्टी आणि दादर येथेही डीवॉटरिंग पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपाययोजनांमुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.






