मुंबई : विधानसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारसभांचा धडाका लावला आहे. या प्रचारसभेत राजकीय नेते आणि उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. तर गेल्या काही दिवसांत काही नेत्यांनी महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकारानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिला नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध वापरण्यात येणाऱ्या अवमानकारक भाषेवर चिंता व्यक्त केली.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांना अशा कोणत्याही कृती, सहभाग किंवा वक्तव्यांपासून दूर राहावे, जे महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध मानले जाऊ शकतात. तसेच, इतर पक्षांच्या नेते किंवा कार्यकर्त्याच्या खासगी जीवनाशी संबंधित कोणताही मुद्दा, जो त्यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नाही. त्यावर टीका करू नये. प्रतिस्पर्ध्याचा अपमान करण्यासाठी खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ले टाळावेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, उमेदवार किंवा राजकीय नेत्यांकडून महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध केलेले अपमानास्पद वक्तव्ये आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणारी कृती आढळल्यास त्यावर वेळेवर आणि कठोर कारवाई करावी. तसेच सर्व उमेदवार आणि पक्षनेते आपली भाषा आणि वर्तन उंचावतील व महिलांच्या सन्मानाशी सुसंगत वर्तणूक करतील, मग ते भाषणांमध्ये असो किंवा सार्वजनिक संवादांमध्ये चांगली भाषा वापरावी, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.