ठाणे : लोकसभा निवडणूकीत मोठ्याप्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी विधानसभा मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाकडे वारंवार दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी मागणी केली होती. परंतु आजतागायत ही नावे संपूर्णपणे वगळण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे हे रिंगणात आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढविली होती. परंतु या निवडणूकीत शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी त्यांचा पराभव केला होता. या निकालानंतर त्यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी तक्रार दिली होती. परंतु ही नावे अद्यापही पूर्णपणे वगळण्यात आलेली नाही. यावेळी सुद्धा बोगस मतदान होण्याची शक्यता विचारे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी ठाणे विधानसभा क्षेत्रातील १२० ठिकाणांवरील ४०७ मतदान केंद्रांवर १०० टक्के सीसीटीव्ही बसविण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.