मुंबई : मुंबईत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना गेल्या सहा महिन्यांत आग लागण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या सर्वच घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहे. बसला आग कशाने लागली, हे समजल्यास त्यानुसार उपाययोजना करून कारवाई करता येईल. मात्र भाडेतत्त्वावर बसपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी या आगीची कारणे किंवा चौकशीचा अहवाल बेस्ट उपक्रमाला सादर केलेला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ३ हजार १६३ बसगाड्या आहेत. यामध्ये बेस्टच्या मालकीच्या १ हजार ५३४ बस, तर भाडेतत्त्वारील १ हजार ६२९ बस आहेत. बेस्ट उपक्रमाने अधिकाधिक एसी इलेक्ट्रिक भाडेतत्त्वावरील बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय येत्या काळात या बसगाड्यांची संख्याही वाढवली जाणार आहे. नव्याने दाखल होणाऱ्या बसगाड्यांमध्ये त्यांची देखभाल-दुरूस्ती होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बसमध्ये बिघाड होण्याबरोबरच बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना मुंबईत सातत्याने घडत आहेत. जानेवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत एकूण सहा घटना गाड्यांना आग लागण्याच्या घडल्या आहेत. या सर्व भाडेतत्त्वावरील एसी आणि नॉन-एसी बस आहेत. आग लागलेल्या भाडेतत्त्वावरील बस या मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड, हंसा सिटी बस सर्व्हिसेस लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेडच्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत भाडेतत्त्वावरील सहा बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र एकाही घटनेतील आगीचे कारण कंत्राटदारांकडून बेस्ट उपक्रमाला सादर केले नसल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. २५ जानेवारी रोजी वांद्रे तलाव येथे, तर ११ फेब्रुवारीला चकाला सिग्नलजवळ, २२ फेब्रुवारीला अंधेरीतील आगरकर चौक येथे, ९ जूनला मरोळ पेट्रोल पंप, १० जूनला अंधेरी सीप्झ बस स्टेशन, १६ जूनला मालवणी आगार या ठिकाणी भाडेतत्त्वावरील बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
- २२ फेब्रुवारीला अंधेरीतील आगरकर चौक येथे नॉन-एसी बसला आग लागली होती. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्याने बेस्ट उपक्रमाने अधिकृतरित्या पत्रक काढून मातेश्वरी कंपनीकडून बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या ४०० नॉन-एसी बसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. या तपासणीनंतरही याच कंपनीच्या आणखी एका बसला १० जून रोजी आग लागली होती.
- जून महिन्यात आणखी दोन कंपनीच्या बसगाड्यांनाही आग लागण्याच्या दोन घटना घडल्या होत्या.