पुणे : शहरात पाण्याच्या टँकरची वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत टँकरचालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी अनिवार्य करण्याचे ठरवले आहे. उन्हाळ्याच्या काळात पाण्याची मागणी वाढल्याने शहरात टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचबरोबर काही ठिकाणी बेफिकीर वाहनचालक, वेगमर्यादा न पाळणे आणि मद्यपान करून वाहन चालविण्याच्या घटनांमुळे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, या चाचणीमुळे टँकरचालक मद्यप्राशन करून कामावर आले आहेत की नाही, हे त्वरित ओळखता येणार आहे.
सद्यस्थितीत महापालिकेकडून शहरातील विविध भागांत सुमारे १५०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, याशिवाय ९० खासगी टँकरही या व्यवस्थेत सहभागी आहेत. शहरभरातील आठ फीडर पॉइंटवरून दररोज सुमारे १६०० टँकरमार्फत नागरिकांना पाणी पुरवले जाते. या वाढत्या वाहतुकीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्षता घेण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने पोलिसांच्या वाहतूक विभागाशी समन्वय साधत ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व टँकर फीडर पॉइंटवर चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी केली जाणार असून, मद्यपान केलेले आढळल्यास संबंधित चालकांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, संबंधित टँकरची सेवा तात्काळ बंद करण्यात येईल. याशिवाय, टँकरचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही मोहीम राबवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







