वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीने पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यानंतर वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. गिलने ७४३ रेटिंग्स पॉईंटसह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज फखर जमानलाही मागे टाकलं आहे. यापूर्वी शुभमन गिल पाचव्या स्थानावर होता. मात्र, आता तो चौथ्या स्थानावर पोहचला आहे गिलच्या नावावर ७४३ रेटिंग्स पॉइंट्स जमा झाले आहेत. शुबमन गिल २०२३ वर्षात धमाकेदार कामगिरी करत आहेत. गिलने या वर्षात आतापर्यंत एकूण १२ वनडे सामने खेळले असून ७५० धावा कुटल्या आहेत. यामध्ये ३ शतक आणि २ अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा हायस्कोअर २०८ धावा आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम याने वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर इमाम उल हक तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम याला अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ११ व्या स्थानी कायम आहे. तर कसोटीत टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन हा पहिल्या स्थानी आहे. तर रविंद्र जडेजा यानेही अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.