नवी मुंबई : हल्ली आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. कधी नोकरीचे आमिष दाखवत, तर कधी प्रॉपर्टीच्या व्यवहारातून, कधी ऑनलाईन व्यवहारातून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. जमीन व्यवहारात व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी सुमारे व्यावसायिकाची २.१ कोटी रुपयांची फसवणूक केली. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. अशोक नारायण पठारे, सुषमा नारायण पठारे, जगदीश परवेश बाटलीवाला आणि परवेश मिनुचर बाटलीवाला अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सप्टेंबर २०२२ मध्ये पावणे एमआयडीसी भागातील एक भूखंड व्यावसायिकाच्या नावावर हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. या व्यवहारासाठी आरोपींनी व्यावसायिकाकडून २.१ कोटी रुपये घेतले होते. मात्र आरोपीमनी व्यावसायिकाच्या नावे भूखंड हस्तांतरीत केलाच नाही. त्याच्याकडून घेतलेले पैसेही त्यांनी वैयक्तिक कारणासाठी खर्च केले. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने पोलिसात धाव घेत चौघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरुन अशोक नारायण पठारे, सुषमा नारायण पठारे, जगदीश परवेश बाटलीवाला आणि परवेश मिनुचर बाटलीवाला या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.