मीरारोड : मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालय २०२० साली सुरु झाले. ४ वर्षात आयुक्तालयातील एका हि पोलीस ठाण्यात महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नव्हत्या . पण आयुक्तालयात पहिल्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मेघना बुरांडे यांची नियुक्ती झाली आहे . मीरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून त्यांना नेमण्यात आले आहे . मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची १ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयचे उदघाटन केले गेले . पहिले आयुक्त म्हणून सदानंद दाते यांच्यावर टाकलेला विश्वास दाते यांनी देखील बऱ्याच अंशी सार्थ ठरवत नव्या आयुक्तालयाची झपाट्याने घडी बसवली . त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदासाठी कोणतीही महिला अधिकारी नसली तरी आता पर्यंत उपायुक्त , सहायक आयुक्त पदी महिला अधिकारी यांनी काम केले आहे . आयुक्तालयात सध्या १९ पोलीस ठाणी आहेत . परंतु पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी आता पर्यंत एकही महिला अधिकारीची नियुक्ती झाली नव्हती.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून मुंबईतून आलेल्या मेघना बुरांडे यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मेघना बुरांडे यांचे वडील सांगलीच्या पलूसचे तर आई कोकणातील पेंडूर कट्टा येथील. दोघेही मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत . घरात कोणीही पोलीस खात्यात नसले तरी वडिलांची इच्छा असल्याने खेळाडू असलेल्या मेघना यांनी पोलीस खात्यात भरती व्हायची जिद्द दाखवत २००५ साली त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या . त्यांनी सहायक निरीक्षक असताना मनोर , नाटे व मांडवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून जबाबदारी पार पडली आहे . त्यांनी आता पर्यंत रायगड , रत्नागिरी , ठाणे ग्रामीण , ठाणे शहर व मुंबई हद्दीत काम केले आहे . अनेक गुन्ह्यांची उकल करतानाच स्पष्ट व परखड शिस्तीच्या म्हणून त्या ओळखल्या जातात . गुन्हेगारीला आळा घालण्यासह नागरिकांशी संवाद साधणे , समाजात पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला असल्याचे सांगितले जाते. मेघना बुरांडे यांना डीजी इन्सिग्निया अर्थात पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक देउन गौरविण्यात आले आहे.