मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशभक्त प्रवाशांना घेऊन पहिली विशेष रेल्वे शुक्रवारी दुपारी दादर स्थानकातून कोकणच्या दिशेने रवाना झाली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात प्रवाशांनी उत्साहाने प्रवास सुरू केला. गेल्या १४ वर्षांपासून मुंबई व परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी हा उपक्रम राबवला जात असून, सुरुवातीला बससेवेच्या स्वरूपात सुरू झालेली ही सुविधा आता विशेष रेल्वेपर्यंत विस्तारली आहे. यंदा ११ आणि १३ सप्टेंबर रोजी दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या असून, दुसरी गाडी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून रवाना होणार आहे. मुंबईहून सुटणारी ही रेल्वे रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ मार्गे सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्रवाशांसाठी मोफत भोजन, पिण्याचे पाणी तसेच प्रवासादरम्यान भजनी मंडळांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नितेश राणे यांनी सांगितले की, कोकणवासीयांमुळेच आपले राजकीय अस्तित्व आणि बळ टिकून आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी आणि विकासासाठी हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येत असून, महायुतीच्या घटक पक्षांकडूनही बस आणि रेल्वेच्या माध्यमातून अतिरिक्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांबाबतही माहिती दिली. महामार्गावरील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, उर्वरित अडचणीही लवकर दूर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने भविष्यात मुंबई ते गोवा प्रवासाचा कालावधी सुमारे साडेपाच तासांवर आणण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी एक्सप्रेसमधील फाटलेल्या आसनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती घेतल्याचे सांगत त्यांनी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक दुरुस्ती तातडीने केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. मुंबईहून कोकणासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुरू केलेल्या बससेवेवरही त्यांनी उपरोधिक टीका केली. आपण एकट्याने दोन विशेष रेल्वे सुरू केल्या असताना दोन नेते मिळून सात-आठ बस सोडत असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या कोकणप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंबा व काजू उत्पादकांच्या ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सांगत, काही दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा-काजू उत्पादकांसाठी विशेष पॅकेज दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला. गणेशोत्सव मंडपांच्या कंत्राटांबाबत बोलताना प्रत्येक धर्माच्या उत्सवांना त्या-त्या धर्माच्या परंपरेनुसारच स्वरूप असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दिशा सालियन प्रकरणातील सीबीआय चौकशीबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार निष्पक्ष तपास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





