जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज १४ दिवस पूर्ण झाले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाला पाठिंबा देणारे ॲड. अभिजित दीपके यांनी राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे. जरांगे यांच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारे तडजोड झाली किंवा त्यांना जबरदस्तीने हलवण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे हे स्वतःसाठी नव्हे तर समाजाच्या हक्कासाठी लढत असल्याचे दीपके यांनी सांगितले. सरकारने त्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावेळी जशी कारवाई करण्यात आली, तसा प्रयत्न जर मनोज जरांगे यांच्या बाबतीत झाला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा दावा त्यांनी केला. “जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी सरकारला कोणतेही कठोर पाऊल उचलण्यापूर्वी विचार करण्याचे आवाहन केले.
सरकारच्या भूमिकेवर टीका करताना दीपके यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाजासाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ नसताना इतर कार्यक्रमांसाठी वेळ दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने स्वतः पुढाकार घेऊन जरांगे यांच्याशी सन्मानपूर्वक चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. आरक्षणाच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या असंतोषामुळे तरुणांमध्ये निराशा वाढत असल्याचे सांगत त्यांनी प्रथमेश नावाच्या तरुणाच्या आत्महत्येचा उल्लेख केला. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून, शिक्षण आणि रोजगाराच्या अभावामुळे अनेक तरुण नैराश्याकडे ढकलले जात असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला. सरकारने आरक्षणासह एमपीएससी परीक्षांशी संबंधित रखडलेले प्रश्नही तातडीने सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या आगामी मुंबई आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आपण त्यात सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






