मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमासाठी शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ९ जुलैपासून महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा अर्धा दिवस भरविण्यात येणार आहेत. शिक्षकांना शाळेतील अध्यापनाचे काम पूर्ण करून उर्वरित वेळेत मतदार यादी पुनरिक्षणाचे काम करता यावे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम कमी करता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहीम सुरू केली असून, मतदार याद्या अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी तसेच शाळेच्या वेळेनंतरही काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याची बाब शिक्षक आणि विविध संघटनांनी उपस्थित करत पूर्णवेळ बीएलओ कामाला तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला.
शिक्षण उपायुक्तांनी ६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मौखिक निर्देशांनुसार ९ जुलैपासून महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा अर्धा दिवस सुरू राहतील. नवीन वेळापत्रकानुसार सोमवार ते शनिवार सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी ७.१५ ते ११.२५, दुपारच्या सत्रातील शाळा ११.३५ ते ३.४५ आणि नियमित अधिवेशनातील शाळा १०.३५ ते २.४५ या वेळेत भरतील. हे वेळापत्रक विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेच्या कालावधीपुरते तात्पुरते लागू राहणार असून मुख्याध्यापकांना त्यानुसार वर्गांचे वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शिक्षकांना बीएलओची जबाबदारी देण्यात आलेली नाही, त्यांनी पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहून अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अतिरिक्त सराव घ्यावा आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घ्यावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांना बीएलओची जबाबदारी पार पाडणे सुलभ होणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या नवीन निर्णयानुसार शाळांचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
- सकाळचे सत्र: सकाळी ७:१५ ते ११:२५
- दुपारचे सत्र: सकाळी ११:३५ ते दुपारी ३:४५
- नियमित (Regular) सत्र: सकाळी १०:३५ ते दुपारी २:४५







