मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदापासून पुन्हा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये येत्या २६ एप्रिल २०२६ रोजी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार मागील काही वर्षांपासून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती. मात्र राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमधील शाळा या इयत्ता चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी सदर परीक्षेपासून वंचित राहू लागले होते. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेला बसता येत नसल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊ लागली होती.
त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा बंद करत पुन्हा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२६ मध्ये इयत्ता चौथी व सातवी तसेच इयत्ता पाचवी व आठवी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर मात्र इयत्ता चौथी व सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येतील. विलंब शुल्कसह अर्ज भरण्याची मुदत ३ ते १७ फेब्रुवारी आहे. तर १८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अति विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे अतिविशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी २४ ते २८ फेब्रुवारी आहे. २८ फेब्रुवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार नाही. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानुसार सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रथम भाषा व गणित या विषयाची, तर दुपारी २ ते ३.३० या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे.







