मुंबई : उध्दव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभेतील सदस्य संजय राऊत हे आगामी लोकसभा निवडणूकीच्या मैदानात शड्डू ठोकणार असल्याची चर्चा सध्या रंगात आली आहे. शिंदे गटाने संजय राऊत यांना लोकसभा निवडणूकीत निवडून येऊन दाखवा असे अनेकदा आव्हान केले. याच पार्श्वभूमीवर राऊत मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राऊत यांनी निवडणूक लढवल्यास संजय राऊत यांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल.
संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून गेले आहेत. ठाकरे गट त्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देणार असल्याची पक्की बातमी आहे. त्याबाबतच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक विरुद्ध संजय राऊत असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. संजय राऊत यांनी आधी लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवावी आणि मग आमच्यावर टीका करावी, असे आव्हान शिंदे गटाकडून सातत्याने दिले केले जात आहे. त्यामुळे राऊत प्रत्यक्षात लोकसभेच्या मैदानात उतरल्यास शिंदे गटाला एक प्रकारे सडेतोड उत्तर मिळणार आहे.