बुलढाणा : विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेसमधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा एक मोठा गट अस्वस्थ झाला आहे. हा अस्वस्थ गट लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याचा दावा दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या मोठ्या प्रमाणात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राज्यातील जनतेने गेल्या दोन वर्षांत राजकारणातील अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहिल्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे भाकीत शिंदे गटातील खासदाराने केले आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा संभ्रम निर्माण झाला. आधी शिवसेना (शिंदे गट), नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आता महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.
विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्ष नेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घेण्याची गरज नाही, त्यांच्याबाबत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, असे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.