मुंबई : मुंबईत सुमारे ५० टक्यांपेक्षा जास्त वाहनांची पीयूसी कालमर्यादा संपलेली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणात भर पडते आहे. अशा वाहनांवर गेल्या महिन्यात आरटीओ कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई केली. या कारवाईत तब्बल १९ लाखांची दंडवसुली केली आहे. मुंबई महानगरातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने वाहनांना आयुर्मानाची मर्यादा घालून दिली आहे. त्याशिवाय वायुप्रदूषण टाळण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढणे अनिवार्य आहे. मात्र त्यानंतरही वाहनधारकांकडून सर्रास नियमांची पायमल्ली केली जाते. गेल्या एका महिन्यात आरटीओच्या प्रदूषण नियंत्रण वायुवेग पथकामार्फत मुंबई महानगरात काळा धूर सोडणाऱ्या १,६७९ वाहनांवर कारवाई करून १९ लाख रुपयांची दंडवसुली केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत बोरिवली, मुंबई मध्य, मुंबई पश्चिम, मुंबई पूर्व, ठाणे, कल्याण, पेण, पनवेल, वसई या मुंबई महानगरातील नऊ आरटीओद्वारे प्रदूषण नियंत्रण वायुवेग पथकामार्फत सीमा तपासणी नाका येथे वाहनांची प्रदूषणविषयक तपासणी केली. यात एकूण १०,०९९ वाहनांची तपासणी केली असून त्यामध्ये १,६७९ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून १९ लाख ११ हजार ५०० रुपये दंडवसुली केली. बोरिवली, मुंबई मध्य, मुंबई पश्चिम, मुंबई पूर्व, ठाणे या पाच आरटीओद्वारे, ताडपत्रीचे आवरण न टाकता मालवाहू वाहनांतून माल वाहून नेणाऱ्या ७३२ वाहनांवर कारवाई केली असून ३१ डिसेंबरपर्यंत तपासणी मोहीम आणि कारवाईचे सत्र सुरू राहणार असल्याचे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.