पुणे : जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने सहाजणांची एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका डाॅक्टरसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी डाॅ. पराग पवार, गणेश गुंड, महादेव ढोपे, रवींद्र वाडकर यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक कुशाभाऊ देगावकर (वय ४८, रा. धनकवडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयडीयल इरा कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात येत आहे. जमीन खरेदीत गुंतवणूक केल्यास जागा १५ पंधरा महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येईल.
जमिनीच्या मूल्यानुसार दरमहा भाडे देण्यात येईल, तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर जागा नावावर केली जाईल, असे आमिष देगावकर यांना आरोपींनी दाखविले होते. आरोपींनी देगावकर यांच्यासह गुंतवणूकदारांकडून ६७ लाख ६० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर देगावकर यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गुंतवणुकदारांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे तपास करत आहेत.