मुंबई : मुंबईतील वाढती वाहनसंख्या आणि अपघात ही मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. मुंबईतील असे २० धोकादायक अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) त्यासाठी कारणीभूत आहेत. तिथे अपघात होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने ‘ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने उपाययोजनांसाठी आराखडा तयार केला आहे. २० पैकी तीन अपघातप्रवण क्षेत्रांचा आराखडा तयार झाला आहे. तीन ठिकाणी कामे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्रही मिळाले आहे.
मुंबई महापालिका आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईतील सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्रांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एप्रिल २०२३ मध्ये बैठक पार पडली होती. बैठकीनंतर मुंबईतील काही अपघातप्रवण क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. मुंबईतील २० अपघातप्रवण क्षेत्रांजवळ अधिक अपघात होऊन पर्यायाने अधिक मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी अपघातांची संख्या कमी व्हावी, या दृष्टिकोनातू सर्व क्षेत्रांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संबंधित अपघात क्षेत्र ठिकाणी आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन आराखडे बनवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मुंबईतील २० पैकी तीन अपघातप्रवण क्षेत्रांचा आराखडा तयार झाल्यानंतर त्याला वाहतूक पोलिसांचीही मंजुरी मिळाली असून, काही किरकोळ कामांनाही सुरुवात केली आहे. तर १७ अपघातप्रवण क्षेत्रांचा आराखडा पालिकेने अंतिम केला असून, त्यापैकी सात क्षेत्रांवर काम सुरू करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडे आराखडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. काही ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामेही सुरू आहेत. त्यामुळे मेट्रो प्रशासनाशी बोलून अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी आणखी काही उपाययोजना कराव्यात का, यासंदर्भात सूचना घेत असल्याचे सांगितले. या कामांना लवकरच वेग देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेमके काय होणार?
– पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी मार्गिकेचे व पदपथाचे रुंदीकरण
– रस्ता ओलांडण्याचे अंतर कमी करण्यासाठी नवीन आश्रयस्थानांची निर्मिती
– वाहतुकीचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी गतिरोधक व पट्ट्या यांच्यासारख्या उपाययोजना
मुंबईतील २० अपघातप्रवण क्षेत्रे
– अमर महल जंक्शन, टिळक नगर, घाटकोपर
– कांजुरमार्ग येथील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जोगेश्वरी- विक्रोळी जोडरस्त्याचा छेदभाग
– पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि शीव- वांद्रे जोडरस्त्याचा छेदभाग, (वांद्रे कलानगर चौक)
– घाटकोपर-अंधेरी जोडरस्ता आणि पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर (पूर्व) यांचा छेदभाग
– प्रियदर्शिनी वाहतूक चौक, शीव-चेंबूर
– जोगेश्वरी पूर्वेतील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता छेदभाग
– शीव वाहतूक चौक, शीव (पश्चिम)
– कांदिवली पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि आकुर्ली मार्गाचा छेदभाग
– माटुंगा पूर्व किंग्ज सर्कल वाहतूक चौक
– सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता आणि लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला पश्चिमचा छेदभाग
– घाटकोपर पूर्व छेडा नगर वाहतूक चौक
– अंधेरी पूर्व साकीनाका वाहतूक चौक
– घाटकोपर-अंधेरी जोडरस्ता आणि लालबहादूर शास्त्री मार्गाचा छेदभाग
– सांताक्रुझ पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जवाहरलाल नेहरू मार्गाचा छेदभाग
– पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, गोरेगाव (पूर्व) चा छेदभाग
– पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एन. एस फडके मार्ग, अंधेरी (पूर्व) चा छेदभाग
– शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता, मानखुर्दचा छेदभाग
– बोरिवली पूर्व संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य मार्ग
-पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग, दहिसर (पूर्व) चा छेदभाग
– गोवंडी पश्चिम पूर्व मुक्त मार्ग आणि घाटकोपर- मानखुर्द जोडरस्ता छेदभाग