मुंबई : मुंबईसह राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराचाच जाहिरात फलक लावता येणार आहे. मर्यादेपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत. इमारतींची गच्ची, आवाराची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत सर्व महापालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आणि कृती अहवाल राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी स्वीकारला आहे.
घाटकोपर येथे १३ मे २०२४ रोजी वारा व मुसळधार पावसामुळे प्रचंड आकाराचा जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला होता. या दुर्घटनेत १७ नागरिकांचा मृत्यू आणि ८० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य शासनाने भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला अहवाल सादर केला होता. इमारतींच्या गच्चीवर किंवा आवाराच्या भिंतींवर मोठ्या आकाराचे जाहिरात फलक लावले जातात. त्यामुळे इमारतींचे नुकसान होते आणि जुन्या इमारतींवर हे जाहिरात फलक लावले गेल्यास ते कोसळण्याची भीती असते. जाहिरात फलकाच्या आकाराची मर्यादा आणि पाया व खांबांची उंची आदींबाबतही तपशीलवार निकष ठरविण्यात आले आहेत.







