मुंबई : आयुर्वेद ही भारताची प्राचीन, समृद्ध आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड दिल्यास आयुर्वेदाला जागतिक स्तरावर अधिक प्रभावी स्थान मिळू शकते, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. विश्व आयुर्वेद परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने ‘आयुर्वेद दिन २०२६’ निमित्त दादर येथील सूर्यवंशी सभागृहात आयोजित एकदिवसीय वैज्ञानिक परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कार्यक्रमाध्यक्ष रणजित पुराणिक, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते, विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विनायक तायडे यांच्यासह आयुर्वेद क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले की, आयुर्वेद ही केवळ रोगांवरील उपचारपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा व्यापक ज्ञानस्रोत आहे. बदलती जीवनशैली आणि वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर आयुर्वेद महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यांनी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्यात स्पर्धा नसून परस्परपूरक सहकार्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून संशोधन, क्लिनिकल चाचण्या आणि पुराव्यांवर आधारित उपचारपद्धती विकसित केल्यास आयुर्वेदाची विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता जागतिक स्तरावर अधिक वाढेल, असेही ते म्हणाले. आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून भारताला या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवून देण्याचे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.






