मुंबई : मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय जाहीर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या युवा सेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर यापूर्वी सर्वाधिक मतदार नोंदणी केलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युवा सेनेला हा धक्का मानला जात आहे. यापूर्वी शिंदे गटाच्या युवा सेनेने सिनेट निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याकडून पदवीधर मतदारांची नोंदणीही करण्यात आली नव्हती. मात्र, आता नव्याने मतदार नोंदणी करण्याचा मुंबई विद्यापीठाचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळे मतदार नोंदणीत शिंदे गटाची युवा सेना जोरदार तयारीने उतरणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
मुंबई विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा प्रभाव आगामी राजकीय घडामोडी तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवरही पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच आता ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
ही निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिंदेंची युवा सेना एकत्रित लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच उद्धव ठाकरे गटाची युवा सेना, मनविसे, छात्र भारती यांच्यासह अन्य काही संघटनाही या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे युती-आघाडीच्या माध्यमातून यंदाची सिनेट निवडणूक लढली जाणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.