विरार : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे. प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) आणि शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती सहज ओळखता याव्यात, यासाठी पीओपीच्या प्रत्येक मूर्तीवर लाल रंगाचे गोल चिन्ह लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी वसई-विरार शहरातही सुरू झाली असून, सर्व मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांना शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरवर्षी वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही मोठ्या संख्येने गणेशमूर्तींची विक्री अपेक्षित असून, त्यापैकी अनेक मूर्ती पीओपीच्या असतात. शासनाच्या १ ऑगस्ट २०२५ आणि १ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार, पीओपी मूर्ती तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाने मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्ट दिसेल असे ऑईल पेंटने लाल रंगाचे गोल चिन्ह करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक मूर्तीची खरेदी-विक्रीची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमामुळे नागरिकांना पीओपी आणि शाडूच्या मूर्तींमधील फरक सहज ओळखता येईल, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळेल. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी वसई-विरार महापालिका मुख्यालयात स्थानिक मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली आणि सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. महापालिकेने स्पष्ट केले की, पीओपी मूर्तींवर लाल गोल चिन्ह लावणे आणि नोंदवही ठेवणे ही जबाबदारी संबंधित उत्पादक व विक्रेत्यांची असेल. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनीही मूर्ती खरेदी करताना लाल गोल चिन्ह तपासावे आणि शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






