ठाणे : काही दिवसांपूर्वी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. याप्रकरणात पोक्सो कायद्यांतर्ग गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. परंतु अवघ्या दोन दिवसांत आरोपीला जामीन मिळाला. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन मिळतो कसा असा प्रश्न उपस्थित केला. तसेच या प्रकरणात पिडीत मुलीचा जबाब नोंदवून आरोपीला पुन्हा अटक करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रसिद्ध मिसळचा आस्वाद घेण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते अमित ठाकरे, अविनाश जाधव, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. ठाण्यात काही दिवसांपूर्वी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केले होते. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्याला तात्काळ जामीन मिळाला. या घटनेनंतर भाजप, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली. आरोपीविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्याप्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली. तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संंवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, बदलापूर सारखे सर्वच गोष्टी अंगावर घेऊ नका. तो व्यक्ती कोणत्या पक्षाशी संंबंधीत आहे हे महत्त्वाचे नसून पक्षाचीही कधी भूमिका नसते. कोणत्याही माणसाची विकृती पंखाखाली घालणार असू तर मग बघायला नको? अशा प्रकारच्या गोष्टी कोणीही पंखाखाली घालू नये. न्यायालय देखील यांना जामीन देते कसे असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच त्या अल्पवयीन मुलीचा पुन्हा जबाब नोंदवून त्या व्यक्तीला अटक करा अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना केल्या. टोलनाक्यावरील आंदोलनात अनेक मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मागे घ्यायला हवे असेही राज ठाकरे म्हणाले. टोलनाक्यावरील आंदोलने ही लोकांसाठी केलेली गोष्ट होती. इतके वर्ष आपल्यावर टोलधाड पडली होती. टोलमधून किती पैसा आला? कोणाकडे गेला? कंत्राटदाराचा पत्ता नव्हता. अखेर मनसेच्या आंदोलनाला यश आले असेही ते म्हणाले.