पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्व जागा गमविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी पराभवाचे खापर मतदानयंत्रावर (ईव्हीएम) फोडले आहे. मतदारसंघात मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे आक्षेपही काही उमेदवारांनी नोंदविले. त्यामुळे सर्व तक्रारी लेखी स्वरूपात तसेच मतदान यंत्रांविरोधात पुरावे गोळा करण्याची सूचना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतन बैठक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. मुंबई वगळता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील ८२ उमेदवार, तेथील स्थानिक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागप्रमुख यांनी या वेळी पराभवाची कारणे सांगितली. मतदारसंघात काय झाले, मतदान कमी का झाले, कोणत्या अडचणी आल्या?, या प्रश्नांची माहिती राज यांनी उमेदवारांकडून घेतली. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. मात्र, त्यानंतर या बैठकीची माहिती वागसकर यांनी पत्रकारांना दिली.
बहुतांश उमेदवारांनी मतदानयंत्रातील घोळामुळे पराभव झाल्याचे या बैठकीत नमूद केले. काही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. विधानसभा निवडणूक ठाम भूमिका घेऊन लढविण्यात आली असली तरी, यापुढील काळात पक्षाचे संघटन वाढविण्याबरोबरच ते मजबूत करावे लागेल, अशी अपेक्षाही उमेदवारांनी व्यक्त केली. मतदानयंत्रांबाबत मोठ्या प्रमाणावर आक्षेप आल्याने त्याबाबत लेखी तक्रार करण्याचे तसेच त्याविरोधातील पुरावे गोळा करण्याची सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. पुरेसे पुरावे जमा झाल्यानंतर ते राज ठाकरे यांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे वागसकर यांनी स्पष्ट केले.