ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि बदलापूर भागात सोनसाखळी, मोबाईल, वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने इराणी वस्तीतून अटक केली. त्यांच्यावर चोरीचे एकूण ७० गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून ५० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
तौफीक हुसेन (२९), मोहम्मद अली उर्फ कालीचरण झवेरी अली (३६), अब्बास जाफरी (२७) आणि सुरज साळुंखे (१९) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याण येथील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनीटकडून सुरू होता. या प्रकरणातील संशयित आंबिवली येथे येणार असल्याची माहिती कल्याण युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये सापळा रचला. त्यावेळी पोलिसांनी तौफीक, मोहम्मद अली, अब्बास आणि सुरज या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी ७० गुन्हे केल्याची कबूली दिली. यामध्ये ४० सोनसाखळ्या, २४ मोबाईल, सहा वाहन चोरीचा सामावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून ५१ तोळे सोन्याचे दागिने, २४ मोबाईल, सहा दुचाकी आणि एक मोटार असे एकूण ५० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांविरोधात ठाणे, कल्याण, बदलापूर, शिळ-डायघर, भिवंडी भागातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.