मुंबई : महामुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचा मुंबई उपनगरी रेल्वेमधील प्रवास सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य-पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या मालडब्यांपैकी एका मालडब्यात बदल करून सुधारित डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. मुंबई उपनगरी रेल्वेगाडीच्या पहिल्या आणि शेवटच्या सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यात प्रत्येकी सात आसने ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतात. लोकलच्या एका गाडीत चार मालडबे असतात. गाडीच्या मध्यभागी असलेल्या मालडब्यात बदल करून तो ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मध्य-पश्चिम रेल्वेने दिला होता. रेल्वे मंत्रालयाच्या इलेक्ट्रिकल डायरेक्टोरेट विभागाने या प्रस्तावाची पडताळणी केली. यानंतर १०४ प्रवाशांच्या क्षमतेच्या राखीव डब्यांच्या बांधणीला मंजुरी दिली आहे. याची क्षमता १३ आसने आणि ९१ प्रवासी उभे अशी असणार आहे. या बदलाला संबंधित प्राधिकरणाने मंजुरी दिली, असे रेल्वे मंडळाच्या प्रवासी विपणन विभागाचे संचालक संजय मनोचा यांनी सांगितले. हे बदल न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावेत, अशा सूचना मनोचा यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सद्यस्थितीत महामुंबईत धावणाऱ्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये ८८ आसनांसह ४ प्रथम श्रेणीचे डबे असतात. ३९ आसनांचे तीन महिला डबे, दिव्यांग प्रवाशांसाठी ३८ आसनांचे दोन डबे आणि उर्वरित डबे सर्वसामान्यांसाठी राखीव आहेत. मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यापूर्वी मध्य रेल्वेने सर्वेक्षण केले होते. यावेळी ९० टक्के सामान्य प्रवासी आणि दहा टक्के मालवाहतूकदार असल्याचे आढळले, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. मालडब्यातील मालवाहकांचे प्रवासी भारमान अत्यंत कमी असल्याने एक मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याची तयारी रेल्वे प्रशासनाकडून दर्शवण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या रोजच्या लोकल प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन मर्यादित आसनांच्या मुद्द्यांवरून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला विचारणी केली. त्यावेळी मालडब्यांचा वापर कमी असल्याने एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यांमध्ये रुपांतर करण्याचे नियोजन असून याचा प्रस्ताव रेल्वे मंडळात मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.