ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंजुम, अलीमघर व खाडीमध्ये पावसाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण ५ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण ४८००० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण १८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
खाडीमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागातील जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित जवानांनी ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी कोकण विभाग निरीक्षक यांच्या समन्वयाने छापे टाकण्यात आले. या कारवाईमध्ये हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे टाकून २५० ड्रम्स रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेमध्ये बोटींमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केली. हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे चालवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कलम ३२८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे, असे उप आयुक्त श्री. पवार यांनी कळविले आहे.