पुणे : पुण्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता एफसी कॉलेजच्या कॉम्पसमधील आयएमडीआर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या युपीएस रूममधील तब्बल ४३ बॅटऱ्या चोरी गेल्याचे समोर आले आहे. या चोरीनंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासात बॅटरी चोरणाऱ्यांना पकडले आहे. कॉलेजच्या कॉम्पसमध्येच चोरी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. सचिन शहाजी डोकडे (वय २१, रा. वडारवाडी) व राहुल यंकाप्पा पाथरूट (वय २०) अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले यांच्या पथकाने केली आहे.
एफसी कॉलेजच्या कॉम्पसमध्ये आयएमडीआर येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची युपीएस रूम आहे. यात कॉलेजचा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर बॅटरी बॅकअप देऊन वीज पुरविण्यासाठी युपीएस सिस्टीम बसविलेली होती. तेथे तब्बल ४३ बॅटऱ्यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स साहित्य होते. दरम्यान, ४ नोव्हेंबरला रूममधून तब्बल ४३ बॉटरी चोरीला गेल्याचे समोर आले. नंतर कॉलेजच्या प्रशासनाने तातडीने डेक्कन पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती. लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी पथकाला सूचना देत आरोपीचा माग काढण्यास सांगितले. पथकाने येथील सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक तसेच खबऱ्यांच्या माहितीवरून सचिन व राहुल या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.