ठाणे : बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या ऋषिकेश म्हात्रे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्टलही हस्तगत केले आहे.
ठाण्यातील तीन हात नाका याठिकाणी म्हात्रे हा अवैधरित्या पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती नौपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भांगे यांच्या टीमने ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन हात नाका सार्वजनिक शौचालयाजवळ म्हात्रे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१), १३५ सह भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.