पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदारास पुणे पोलिसांनी अटक केली. ललितच्या नाशिकमधील मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना, तसेच अमली पदार्थ विक्रीची जबाबदारी आरोपीकडे सोपविण्यात आली होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पोलिसांना मिळाली आहे. रोहन उर्फ गोलू अन्सारी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी अन्सारीला ठाणे परिसरातून अटक केली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अन्सारी सहआरोपी आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अन्सारीचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला. नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत ललित आणि त्याचा भाऊ भूषण यांना मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरूकेला होता. आरोपी अन्सारी अमली पदार्थ विक्रीतून मिळणारे पैसे ललित आणि भूषणकडे देत होता. नाशिकमधील मेफेड्रोन निर्मितीच्या कारखान्याची जबाबदारी अन्सारीकडे सोपविण्यात आली होती.
अन्सारीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अन्सारीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि अभियंता अरविंदकुमार लोहारे यांना चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात लोहारेने मेफेड्रोन या अमली पदार्थ निर्मितीची माहिती कारागृहात ललितला दिली. ही माहिती घेऊन ललित व त्याचा भाऊ भूषणने नाशिकमध्ये मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू केला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. ललितला मुंबई पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललितला पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करायची आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ललितविरुद्ध मेफेड्रोन बाळगणे, तसेच रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. ललितचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.