मुंबई : महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, २, ७८ आणि ८५ मध्ये आवश्यक सुधारणा करून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना ८ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी १६ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात दिली. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची तसेच समृद्ध मराठी संस्कृतीची भूमी असल्याचे सांगताना त्यांनी रोजगारासाठी देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचे राज्यात स्वागत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, राज्यातील नागरिकांशी संवाद साधण्याइतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगत महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही स्वीकारावे, कारण मराठीचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि जनतेच्या भावनांचा सन्मान असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा निर्णय कोणत्याही भाषेच्या विरोधात नसून सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी, प्रवासी-चालक संवाद सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. चालक आणि प्रवाशांमधील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतुकीवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिवहन विभागाने राज्यभर विशेष प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार वर्ग घेतले जात असून, दैनंदिन व्यवहारातील मराठी संवाद, दिशा, भाडे, आपत्कालीन प्रसंग तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी संवाद यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सोप्या पुस्तिका, संवादमाला आणि प्रशिक्षण साहित्याच्या माध्यमातून चालकांना व्यवहारिक मराठी सहज आत्मसात करता यावी, यासाठी शासनाने विशेष व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी सांगितले.






