रायगड (माणगाव) : “माझी मुलगी आकाशात झेप घेण्याची स्वप्ने पाहतेय… तिच्या डोळ्यांतील ती चमक मी रोज पाहतो… पण आज तिची स्वप्ने माझ्या डोळ्यांसमोर तुटताना पाहण्याची वेळ आली आहे. साहेब, माझ्या मुलीच्या स्वप्नांचे विमान खाली पडू देऊ नका…” रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले हे शब्द एका सर्वसामान्य वाहन चालक बापाच्या वेदना व्यक्त करणारे आहेत. माणगाव तालुक्यातील रमेश टोळकर यांनी आपली मुलगी मीनाक्षी टोळकर हिच्या वैमानिक होण्याच्या स्वप्नासाठी न्याय मागत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. कारण, तब्बल दीड वर्षे शैक्षणिक कर्जासाठी (एज्युकेशन लोन) हेलपाटे मारल्यानंतर बँक ऑफ इंडिया, माणगाव शाखेने अखेर कर्ज नाकारल्याने मीनाक्षीचे पायलट होण्याचे स्वप्न अधांतरी लटकले आहे. मीनाक्षी सध्या बारामती येथील अकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन प्रा. लि. येथे वैमानिक प्रशिक्षण घेत आहे. अत्यंत कठीण आणि खर्चिक असलेल्या या शिक्षणासाठी सुमारे ४७.५० लाख रुपयांची आवश्यकता आहे. मुलीच्या शिक्षणासाठी रमेश टोळकर यांनी स्वतःची आणि नातेवाईकांची मालमत्ता तारण ठेवण्याची तयारी दाखवली. जवळपास ८० ते ९० लाख रुपये किंमतीची मालमत्ता बँकेसमोर गहाण ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र एवढी सुरक्षितता उपलब्ध असतानाही बँकेने कर्ज मंजूर केले नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. टोळकर कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, बँकेने सुरुवातीपासूनच कर्जाबाबत स्पष्ट भूमिका न घेता दीड वर्षे विविध कागदपत्रांची मागणी केली. प्रत्येक वेळी नवीन अट, नवीन कागदपत्र आणि नवीन शंका उपस्थित केल्या गेल्या. त्यामुळे कर्ज मिळेल या आशेवर कुटुंब वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करत राहिले. मात्र अखेरीस कर्ज नाकारल्याचे पत्र हातात पडले आणि संपूर्ण कुटुंबावर जणू आभाळ कोसळले.
विशेष म्हणजे, बँकेने आपल्या पत्रात रजिस्ट्रेशन फी, प्रशिक्षणाचा कालावधी आणि टप्प्याटप्प्याने होणाऱ्या फ्लाईंग प्रशिक्षण खर्चाचा उल्लेख करत कर्ज नाकारले आहे. प्रशिक्षण संस्थेने अधिकृतपणे लेखी दिले आहे की, प्रत्यक्ष फ्लाईंग प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर कोर्स पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. तरीही या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून बँकेने कर्ज नाकारलेल्या पत्रात म्हटले आहे की सदरची विद्यार्थिनी कोर्स पूर्ण करू शकेल का? त्यांच्या म्हणण्या नुसार प्रशिक्षण पूर्ण केले नाही तर तिला नोकरी कशी मिळेल आणि आमचे कर्ज कसे फेडले जाईल, असा प्रश्न बँकेसमोर आहे परंतु प्रशिक्षण संस्थेने स्पष्ट स्पष्ट केलेले असतानाही बँकेचे हे आडमुठे धोरण विद्यार्थीच्या स्वप्नाच्या आड येत आहे. बँक ऑफ इंडिया ही जिल्ह्याची लीड बँक म्हणून मिरवते मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्यांना न्याय देण्यात ती कमी पडते असे चित्र यावरून दिसून येते. प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, जर हेच मुद्दे होते तर एक दीड वर्ष अर्जदारांना आशेवर का ठेवण्यात आले? दोन वर्षे फाईल फिरवून, कागदपत्रांची मागणी करून शेवटी नकार देणे ही प्रक्रिया विद्यार्थिनीच्या भवितव्याशी खेळण्यासारखी नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. आज मीनाक्षीने आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. तिच्याकडे क्षमता आहे, जिद्द आहे, मेहनत आहे. मात्र फ्लाईंग प्रशिक्षणासाठी आवश्यक शुल्क नसल्याने तिचे पुढील शिक्षण थांबले आहे. ज्या मुलीने विमानाच्या कॉकपीटमध्ये बसण्याचे स्वप्न पाहिले, ती आज बँकेच्या निर्णयामुळे वर्गखोलीबाहेर उभी आहे. रमेश टोळकर यांच्यासाठी ही केवळ आर्थिक लढाई नाही. हा एका बापाचा आपल्या मुलीच्या भविष्याकरिता सुरू असलेला संघर्ष आहे. रोज वाहन चालवून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी मुलीला शिकवले. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून तिच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला. आज त्याच बापाला सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या प्रकरणात आता सर्वांच्या नजरा रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे लागल्या आहेत. कारण टोळकर कुटुंबाच्या मते, प्रशासनाने हस्तक्षेप केल्याशिवाय या विद्यार्थिनीला न्याय मिळण्याची शक्यता धूसर आहे. बँकेच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, प्रकरणाची चौकशी व्हावी आणि एका पात्र विद्यार्थिनीच्या भवितव्याशी झालेला अन्याय दूर व्हावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, सामाजिक क्षेत्रातूनही या प्रकरणाबाबत सहानुभूती व्यक्त केली जात आहे. कारण हा प्रश्न केवळ मीनाक्षी टोळकर यांचाच नाही, तर मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि शिक्षणाच्या बळावर आयुष्य बदलू इच्छिणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा आहे. आज एक मुलगी आकाशात भरारी घेण्यासाठी धडपडत आहे. एक बाप तिच्या पंखांना बळ मिळावे म्हणून दारोदार फिरत आहे. आणि प्रश्न फक्त एवढाच आहे.
“मीनाक्षीच्या स्वप्नांचे विमान उड्डाण घेणार की कागदपत्रांच्या ढिगाऱ्यातच कोसळणार?”
याचे उत्तर आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी द्यायचे आहे.
“लहानपणापासून आकाशात उडणारे विमान पाहिले की, एक दिवस ते मीच उडवेन, हे स्वप्न मी उराशी बाळगले. त्या स्वप्नासाठी मी रात्रंदिवस मेहनत घेतली, परीक्षा उत्तीर्ण झाले आणि वैमानिक प्रशिक्षणापर्यंत पोहोचले. माझे वडील रमेश टोळकर हे एक साधे वाहन चालक आहेत. त्यांनी स्वतःच्या सुखाचा कधी विचार केला नाही; माझ्या शिक्षणासाठी आयुष्यभर कष्ट केले. आज मला वैमानिक बनून त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे चीज करायचे आहे. मात्र बँकेने माझ्या प्रशिक्षणाच्या कालावधीवर आक्षेप घेत एज्युकेशन लोन नाकारले. वस्तुस्थिती अशी आहे की, माझ्या प्रशिक्षण संस्थेने अधिकृतपणे लेखी दिले आहे की, प्रत्यक्ष फ्लाईंग प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर कोर्स पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. तरीही या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मा. जिल्हाधिकारी साहेब, मी कोणतीही सवलत मागत नाही; मी फक्त माझ्या शिक्षणाचा हक्क आणि न्याय मागत आहे. कृपया माझ्या वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टांवर पाणी फिरू देऊ नका. माझ्या स्वप्नांचे विमान आकाशात झेप घेण्यापूर्वीच खाली पडू देऊ नका,मला न्याय द्या.” अशी आर्त याचना विद्यार्थिनी मीनाक्षी टोळकर हिने केली आहे.






