पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत कचऱ्याचा प्रचंड डोंगर घसरून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीवर कोसळल्याने १८ कामगार कचऱ्याखाली अडकले. सायंकाळपर्यंत सहा आणि रात्री उशिरा आणखी तीन अशा एकूण नऊ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली असून उर्वरित कामगारांचा शोध घेण्यासाठी रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी दहापर्यंत शोधमोहीम सुरू राहणार असून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दल, एनडीआरएफ, पोलीस तसेच देहूरोड येथील भारतीय लष्कराचे अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधण्यासाठी माइक व लहान ड्रोनचा वापर करण्यात आला, तर श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून पाइपद्वारे प्राणवायू पुरविण्यात आला. कटरच्या सहाय्याने भिंतीत भगदाड पाडून आणि स्लॅब फोडून जवानांनी आत प्रवेश केला. सोमनाथ शेळके, सचिन दबडगाव, दादासाहेब आडे, सुजाता शिंदे, रामप्रतापसिंह चौहान, रणवीरसिंग यांच्यासह विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत यांची सुटका करण्यात आली. काही कामगारांनी वेळेत इमारतीबाहेर उड्या मारल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
मोशीतील आदर्शनगर येथे ८१ एकर क्षेत्रावर असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प कार्यरत आहे. सलग पाच दिवस झालेल्या पावसामुळे कचऱ्याच्या डोंगराचे स्खलन होऊन ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुर्घटनेच्या वेळी दुपारच्या जेवणासाठी २३ कामगार इमारतीत उपस्थित होते. त्यापैकी पाच जण तत्काळ बाहेर पडले, तर १८ जण अडकले होते. १९९१ मध्ये सुरू झालेल्या या डेपोमध्ये गेल्या ३५ वर्षांपासून शहरातील कचरा जमा होत असून त्याची क्षमता आता संपुष्टात आली आहे. २०१७ मध्ये शहरात दररोज ८३२ टन कचरा निर्माण होत होता, तर सध्या हा आकडा १,५७९ टनांवर पोहोचला आहे. उपलब्ध जागा आणि प्रक्रिया क्षमतेच्या मर्यादेमुळे कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाल्याचे समोर आले आहे. आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला, तर महापालिका प्रशासनाने जखमींवर तातडीने उपचार सुरू असल्याची माहिती दिली. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.






