उरण : न्यायालयाने पीओपी गणेशमूर्तीना परवानगी दिल्याने जगात गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण (हमरापूर) परिसरात गणेशमूर्तीकारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हा निर्णय उशिरा झाल्याने मूर्ती घडविण्याच्या मजुरीत ३० टक्केची वाढ झाली आहे. याचा फटका येथील गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना बसला आहे. मात्र उशिरा का होईना परवानगी मिळाल्याने मूर्तिकारांनी आनंद व्यक्त केला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवाला अवघा महिना उरला असून गणेशमूर्तीकारांची लगबग सुरू आहे. गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील दादर,कळवे, जोहे,तांबडशेत या गावातील गणपती कारखान्यातून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. या परिसरात एक हजारापेक्षा अधिक छोटे मोठे कारखाने आहेत. प्रत्येक घरात एक कारखाना आहे. येथील मूर्तिकार मजूर हे वर्षातील आठ महिने मूर्ती बनविण्याचे काम करतात तर दोन महिने हे कारखाने बंद असतात. कळवा येथील लोकमान्य कला केंद्र चे मालक वसंत पाटील यांच्या कारखान्यात दहा वर्षांपासून मूर्ती बनविल्या जात आहेत. यात किमान ५ फूट उंच मुर्त्या तयार करतात. या गणेश मूर्त्याना राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, कोकणासह कल्याण, ठाणे , मुंबईतुनही मागणी आहे.







