मुंबई : राज्यात निवडणुकांचं वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन सहकारी आणि मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतायत. गावागावात जाऊन मतं मागत आहेत. या गावपातळीवरच्या निवडणुका असून, यात पैशाचा धूर निघताना दिसतोय. सामनाच्या अग्रलेखातही याचा उल्लेख केलेला आहे. पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीनं महाराष्ट्रात सुरू आहे. एक प्रकारचा सत्तेचा माज आणि दर्प राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि वागणुकीतून महाराष्ट्र पाहतोय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
मी आठ ते दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यात शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. मी त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाही. नागरिकांशी बोलत नाही. जिथे जातायत तिथे पैशाचा थैल्या उघडल्या जाताहेत आणि मतं मागितली जातायत. हे चित्र फार भयानक आहे, मी दोन विषय तुमच्यासमोर मांडणार आहे, त्यात एकूणच मुंबईमध्ये गेली दोन ते तीन वर्षं प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतोय. जे काही रिपोर्ट्स येतायत, त्यानुसार मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. राज्यकर्ते म्हणतील इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचे ढग इकडे आलेत की काय? तर याचा आणि इथिओपियातील ज्वालामुखीचा काहीही संबंध नाही, हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे. त्यातून हे भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावतायत. मी जो विषय घेतलाय तो प्रदूषणाचा आहे. मी मुख्यमंत्री झालो असताना तत्काळ आरेमधल्या कारशेटडला स्थगिती दिली होती. याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता. पण मेट्रोसाठी आरेऐवजी आणि कांजूरमार्गची जागा सुचवली होती. ती जागा आता या सरकारनं घेतलेली आहे आणि आरेची झाडं कापलेलीच आहेत, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.







