नागपूर : सध्या सर्वांना नववर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. काहींनी तर तयारी देखील सुरू केली आहे. अनेक जण आता पासून माहोल करत आहेत. पण हिच चिलपार्टी आता महागात पडू शकते. कारण नववर्षाच्या पार्शभूमीवर पोलिसांनी आजपासून शहरात १३१ ठिकाणी नाकाबंदी सुरु केली आहे.
नव वर्षाच्या स्वागतावरील उन्मादाला आवर घालण्यासाठी पोलिसांतर्फे शहरात मंगळवारपासून १३१ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याचे सांगत पत्रकारांशी साधलेल्या संवादात पोलीस आयुक्त सिंगल म्हणाले, गेल्या वर्षभरात ऑपरेशन यु टर्न मुळे प्राणांतिक अपघाताच्या ८० घटना कमी झाल्या. यात ९० जणांचे प्राण वाचवणे शक्य झाले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये २० आणि अमरावती शहर १७ टक्के दर कमी झाला. पुण्यातील अपघाती मृत्यू संख्या ५५ तर छत्रपती संभाजी नगरातील अपघाती मृत्यू संख्या १८ ने कमी झाली. मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्यांविरोधात रोज ३,००० पेक्षा अधिक जणांची तपासणी केली जात आहे. चालू वर्षात आतापर्यंत ५,३६६ प्रकरणे नोंदवली गेली. पुनरावृत्ती करणाऱ्या मद्यपींना १५ दिवसांचा कारावासही करण्यात आला आहे. शहरात दररोज फिरत्या पद्धतीने ९० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येते.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उन्मादाला आवर घालण्यासाठी १३१ ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांवर करडी नजर ठेवली जात आहे. अतिवेग, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, ट्रिपल सीट आणि बेदरकार वाहनचालना यावर विशेष पथके कार्यरत आहेत. दररोज सरासरी ६० पेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई होत असून, आतापर्यंत ८८० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दोषींना ताब्यात घेऊन वाहने जप्त केली जात आहेत.







