नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाने (एनएमएमटी) बसमधून प्रवास करताना मोबाइलच्या वापरावर निर्बंध घातले आहे. या संदर्भात परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, प्रवाशांना मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास मनाई आहे. सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक बसमधून प्रवास करताना अनेक जण मोबाइल फोनवर मोठमोठ्याने संभाषण करतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात. यामुळे सहप्रवाशांना त्याचा त्रास होतो. स्मार्टफोनच्या आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. मोबाइलच्या आवाजाच्या कारणावरून बसमध्ये प्रवाशांमध्ये वाद विवादाचे प्रकार होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित प्रवाशांवर मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम ३८/१,२ व ११२) कारवाई होऊ शकते, असे या आदेशात म्हटले आहे. एनएमएमटी परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये इयरफोनशिवाय मोबाइलवर ऑडिओ / व्हिडीओ लावण्यास तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन उपक्रमातील सर्व चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कार्मचारी यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.