मुंबई : मध्य रेल्वेवरील परळ (पूर्व) स्थानकाबाहेरून बेस्टतर्फे १६३ व १७७ क्रमांकाच्या बस सोडल्या जात होत्या. अचानक बेस्ट प्रशासनाने या बस बंद केल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. या मार्गावर धावणाऱ्या बस त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. परळ येथील वाडिया महिला व बालकांसाठीचे रुग्णालय, टाटा कॅन्सर रुग्णालय, केईएम सर्वसाधारण रुग्णालय येथे जाण्यासाठी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांसाठी या बस सोयीस्कर होत्या. स्थानकाजवळून सार्वजनिक वाहतुकीची सोय नव्हती. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना टॅक्सीशिवाय पर्याय नव्हता. टॅक्सीसुद्धा वेळेत उपलब्ध होत नसे. त्यामुळे अनेकजण दादर येथून सरळ टॅक्सीमधून रुग्णालयात पोहोचत असत.
काही काळानंतर येथून शेअरिंग टॅक्सीची सुविधा सुरू झाली होती; मात्र अनेक रुग्णांना ही सुविधा घेणे परवडत नव्हते. मर्यादित टॅक्सी सुविधा असल्याने रुग्णांना अनेकदा ताटकळत राहावे लागत होते. यावर तोडगा म्हणून बेस्ट प्रशासनाने परळ (पूर्व) स्थानक ते शिवडी स्थानकादरम्यान बसची सुविधा सुरू केली होती. मिनी बस व तीही वातानुकूलित असल्याने रुग्ण व अन्य प्रवाशांची चांगली सोय झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. बेस्ट प्रशासनाने अचानक या बस बंद केल्याने गरीब रुग्ण व प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. बसने सहा रुपयांत प्रवास करता येत होता. तर, टॅक्सीसाठी जादा पैसे द्यावे लागत आहेत.