मुंबई : ‘तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा, नाहीतर २०२४ मध्ये तुमचे सत्तेचे यान भरकटेल’, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. देशाची चिंता करण्यासाठी मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल, अशी टीका करत बावनकुळे यांनी ठाकरे गटाला धारेवर धरले. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मग ते चांद्रयानाची मोहिम असो की सूर्यावरची मोहिम. घटनेचाही वापर राजकारणी टिकाटिप्पणी करण्यासाठी करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे.
मात्र आज ते चांद्रयान मोहीमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. कोरोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात, त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही, अशी टीका बावनकुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे. सदरील ट्विटमध्ये ते पुढे लिहितात, संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दलभारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात यादोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी यादोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिले होते. पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही. कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फडणवीसजींनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली असल्याचे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी, असा टिमटाही त्यांनी काढला.