बारामती : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क जाहीर केल्यामुळे राज्यातील कांदा प्रश्न अधिकच चिघळला आहे. शेतकऱ्यांनी राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद पाडले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचेही जाहीर केले. शिवाय तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला २४१० रुपये भाव देण्याची घोषणाही केली आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन शमलेले नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार हे कृषी मंत्री असताना त्यांनी असा निर्णय घेतला नव्हता, तो केंद्र सरकारने घेतला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत म्हटले होते. शिंदे यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार चांगलेच तापलेले दिसले. शरद पवार यांनी या विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यांशी संवाद साधतांना बोलत होते.
मी कृषी मंत्री असताना असा निर्णय झाला नव्हता हे खरे आहे. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे बरोबर आहे. कारण मी कृषीमंत्री असताना ४० टक्के ड्युटी कधी लावली नव्हती, अशी कान उघडणी करतानाच आताच कांदा प्रश्न कशावरून उद्भवला, असा सवाल करत तुम्ही आधी ४० टक्के ड्युटी रद्द करा, प्रश्न संपेल. त्यामुळे मुख्यमंत्री जे म्हणत आहेत त्यांना काही माहिती नाही. ते अर्धवट माहिती देत आहेत. त्यांनी ४० टक्के ड्युटी रद्द होण्याचा प्रयत्न करावा. तो होत असेल तर त्यांच्या म्हणण्या नुसार मी मान्य करेन, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.