मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करताना रेल्वे कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासह आयआरसीटीसीची यंत्रणा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या दक्षता विभागाने पावले टाकली आहेत. मेल-एक्स्प्रेसमधील खानपान डब्यातील खासगी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्यापूर्वी आपल्याकडील रोख रक्कम घोषित करणे सक्तीचे करण्यात आले आहे. रेल्वेगाडीत जादा दराने बाटलीबंद पाणी विकणे, खाद्यपदार्थांसाठी दरपत्रकापेक्षा अधिक दर आकारणे आणि आरक्षित आसन देण्यासाठी तिकीट तपासनीसांना चिरीमिरी देणे अशा तक्रारी प्रवाशांकडून वारंवार होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रेल्वेने दक्षता विभागाला उपाय सुचविण्याचे आदेश दिले होते. यानंतर दक्षता विभागाने संबंधित उपायांची अंमलबजावणी करण्याची सूचना देशातील सर्व क्षेत्रीय (झोनल) रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिली आहे. यानुसार रेल्वेतील खानपान डब्यातील व्यवस्थापक, कंत्राटी कर्मचारी आणि रेल्वेतील विक्रेते आणि सर्व कर्मचारी यांनी कामावर हजर राहण्यापूर्वी आपल्याकडील रोख रक्कम घोषित करणे सक्तीचे आहे. याची सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये तातडीने अंमलबजावणी करावी, अशी लेखी सूचना रेल्वे मंडळाच्या दक्षता विभागाचे उपसंचालक आकाश भारद्वाज यांनी जाहीर केली आहे.
प्रवाशांकडून घेतलेली चिरीमिरी ठेवण्यासाठी टीसीसह अन्य कर्मचाऱ्यांकडून खानपान डब्यातील कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो. तिकीट तपासनीसांना कामावर येण्यापूर्वी आपल्या ताब्यातील रक्कम घोषित करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. अशा रकमेहून अधिक पैसे आढळल्यास दक्षता विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. आता खानपान डब्यातील कर्मचाऱ्यांनाही ही रक्कम घोषित करणे सक्तीचे करण्यात आले आहे, असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय निवडक रेल्वेगाड्यांमध्ये अचानक तपासणी मोहीम घेण्यात येणार आहे, असेही दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वेगाड्यांमध्ये गस्त घालताना आणि कर्तव्यावर असताना निवडक रेल्वेगाड्यांतील टीसी आणि रेल्वे सुरक्षा दलातील जवानांना बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. लाचखोरीच्या तक्रारी जास्त असलेल्या मेल-एक्स्प्रेसमध्ये असे बॉडी कॅमेरे द्यावे. यामुळे लाचखोरीला आळा बसेल त्याचबरोबर रेल्वेगाडीत अयोग्य घटना घडल्यास त्याचा तातडीने छडा लावण्यास मदत होईल, असा सूर अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लावला आहे.