बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अजित पवार हे आमचेच नेते आहेत असे म्हटले आहे. यावरच नथांबता ते म्हणाले की, राष्ट्रवादीत फूट पडलीच नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आणखी गडद होत चालले आहे. शरद पवार हे बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीं सोबत संवाद साधत होते. अजित पवार आमचे नेते आहेत, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यावर तुमचे काय मत आहे, असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर अजितदादा नेते आहेत. यात वादच नाही. फूट म्हणजे काय, पक्षात फूट कधी होते, जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर, तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असे म्हणता येत नाही, असे शरद पवार म्हणाले.
अजितपवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे विधान आधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राष्ट्रवादीत काही तरी खलबतं होत आहेत अशी चर्चा रंगलेली असतानाच शऱद पवार यांनी त्याला बळ देणारी विधाने करून महाविकास आघाडीत होणाऱ्या संभ्रमाला आणखी गती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमध्ये होणाऱ्या सभेबाबत विचारले असता त्यावरही त्यांनी भाष्य केले. लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. त्याबद्दल चिंता नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे. त्यामुळे कोणीही सभा घेऊन भूमिका मांडत असेलतर आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही पवार म्हणाले.