मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात आले आहे. मुंबई शहरातील १० आणि उपनगरातील २६ असे मिळून, एकूण ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत महिलांच्या रचनात्मक सहभागाचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेली ही मतदान केंद्रे असणार आहेत.
महिला नियंत्रित मतदान केंद्रांमुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राच्या सुरक्षिततेवर लक्ष दिले जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यानजीकच्या केंद्रांची; तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्रांची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्व जण महिला असतील. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रांत कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही; तसेच मतदान केंद्रातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.