पुणे : परदेशात पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी पाषाणमधील एका आयटी महिला अभियंत्याची १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पाषाण येथील एका ३५ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अज्ञात मोबाईलवरून फोन आला. समोरील व्यक्तीने तो मुंबईमधील फेडेक्स कुरिअरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने एक पार्सल मुंबई ते इराण या ठिकाणी जाणार होते.
त्या पार्सलमध्ये पासपोर्ट, दोन क्रेडिट कार्ड, लॅपटॉप आणि ७५० ग्रॅम ड्रग्ज असल्याचे सांगितले. याबाबत फेडेक्सने नार्कोटिक्स विभागाला तक्रार दिली आहे. त्यानंतर कारवाईची भीती दाखवून आरोपींनी या महिलेची नोकरी आणि बॅंक स्टेटमेंटबाबत माहिती घेतली. त्यानंतर स्काईपवर स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. या महिलेच्या बँक खात्याच्या मोबाईल ॲपद्वारे लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले. कारवाई टाळण्यासाठी बँक खात्यात १९ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने भीतीपोटी आरोपींच्या बॅंक खात्यात ही रक्कम आरटीजीएसद्वारे हस्तांतरित केली. महिलेने घडलेला हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.